150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मूल्यमापनात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यस्तरीय चौथा क्रमांक

मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात नवी मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि नागरिक-केंद्रित सेवांमध्ये केलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हे मानांकन प्राप्त झाले असून ही कामगिरी नवी मुंबईकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ, ‘माय एनएमएमसी’ ॲप, ‘आपले सरकार’ पोर्टलशी संलग्नता, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ई-ऑफिस, डॅशबोर्ड, एआय, ब्लॉकचेन व जीआयएस आधारित सेवांद्वारे नागरिकांना करभरणा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, तक्रार निवारण, माहिती सेवा आदी सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व घटकांचे सखोल मूल्यमापन क्यूसीआय या नामांकित त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आले.

ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे कार्यालयीन कामकाजात वेग व पारदर्शकता वाढली असून जीआयएस, एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरातून सेवा वितरण अधिक कार्यक्षम झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर करत नागरिकांना अधिक सुलभ, जलद व दर्जेदार सेवा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पुढील काळातही विविध डिजिटल उपक्रम राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *