प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत १० हजारांचा दंड, ११.५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा सातत्याने राबविण्यात येत असून दिनांक २२ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या कारवाईत ५ व्यावसायिकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करत ७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला होता.

याच मोहिमेचा भाग म्हणून सलग दुसऱ्या दिवशी, दिनांक २३ जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या कारवाईत २ व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला. या कारवाईत एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ११.५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेत वाशी विभागात ५ हजार रुपयांचा दंड वसूल करत १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या, तर तुर्भे विभागात ५ हजार रुपयांचा दंड वसूल करून ३.५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून, केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

प्लास्टिकच्या वाढत्या धोक्याचा विचार करता नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *