दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे गुंतवणूक सामंजस्य करार; ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार केले असून, आणखी १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भातील प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या एकूण गुंतवणुकीतून सुमारे ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या करारांपैकी सुमारे ८३ टक्के गुंतवणूक थेट परकीय गुंतवणूक असून १८ देशांमधून महाराष्ट्रात भांडवल येत आहे. औद्योगिक, सेवा, कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य, डेटा सेंटर्स, एआय, ग्रीन स्टील, फिनटेक, लॉजिस्टिक्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांत ही गुंतवणूक होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या करारांपैकी सुमारे ७५ टक्के करार प्रत्यक्षात परावर्तित झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुंतवणुकीचे वितरण राज्यभर होत असून कोकण, मुंबई महानगर क्षेत्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे. याशिवाय टाटा समूहाच्या सहकार्याने मुंबईजवळ देशातील पहिली ‘इनॉव्हेशन सिटी’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करण्यासह रायगड–पेण ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून नव्या औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *