नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 5 (ड) मध्ये भारतीय जनता पार्टीचे अशोक पाटील यांनी सर्व राजकीय गणिते उलथवून लावत सलग चौथ्यांदा विजय मिळवत ऐतिहासिक ‘चौकार’ लगावला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केले.
या निवडणुकीत अशोक पाटील यांनी एकूण 7,303 मते मिळवत 883 मतांच्या भक्कम फरकाने विजय संपादन केला. या लढतीत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चेतन नाईक तसेच शिवसेनेच्या एम. के. मढवी कुटुंबातील उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला. दोन बलाढ्य राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर मात करत त्यांनी आपला बालेकिल्ला कायम राखला.
प्रस्थापित कुटुंबीय राजकारणासमोर अशोक पाटील यांचा अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण जनसेवा हे निर्णायक ठरले. मागील कार्यकाळात केलेली ठोस विकासकामे, जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका आणि तळागाळातील मजबूत संपर्क हे त्यांच्या विजयामागील प्रमुख घटक मानले जात आहेत.
या निकालामुळे प्रभाग 5 (ड) मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, अशोक पाटील यांचे नेतृत्व पुन्हा एकदा मतदारांनी ठामपणे स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.














Leave a Reply