नवी मुंबईत आचारसंहिता उल्लंघनावर विशेष पथकांची कडक नजर

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 15 डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, तिचे काटेकोर पालन होण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करून शहरभर निरीक्षण आणि नियंत्रणाची कार्यवाही सुरू आहे.

महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत लाच, वस्तू किंवा मद्य वाटप, धमकी, प्रलोभन, धार्मिक तणाव, घोषणाबाजी व आचारसंहिता भंग करणाऱ्या बाबींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

नागरिकांनी आचारसंहिता उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 309 / 1800 222 310 वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शांततापूर्ण, निष्पक्ष व लोकशाही मूल्यांनुसार निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे नमुंमपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *