निवडणूक पारदर्शकतेसाठी नमुंमपा मुख्यालयात मीडिया मॉनिटरिंग व मीडिया सेंटर कार्यान्वित

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी नमुंमपा मुख्यालयात प्रसारमाध्यमे निरीक्षण कक्ष (Media Monitoring Center) आणि माध्यम कक्ष (Media Center) कार्यान्वित करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही व्यवस्था महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.

मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या निरीक्षण कक्षातून वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या, युट्यूब, समाजमाध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्मवरील निवडणूकविषयक सामग्रीचे निरीक्षण केले जाणार आहे. तळमजल्यावरील पत्रकार कक्षात माध्यम कक्ष सुरू करण्यात आला असून, माध्यमांना निवडणूकविषयक माहिती देण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

निवडणूक काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन बंधनकारक असून, पेड न्यूज, समाजमाध्यमांवरील देखरेख व तक्रारींचे निराकरण माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत केले जाणार आहे. 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू असून, सर्व घटकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *