नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पत्रकार परिषदेतून सुसंवाद साधत निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून, शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली pasted।
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 23 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 तसेच 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 अशी राहणार आहे. 25 आणि 28 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले
31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, 2 जानेवारी 2026 रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक 111 सदस्यांसाठी 28 प्रभागांत होणार असून, त्यापैकी 27 प्रभाग चार सदस्यीय तर 1 प्रभाग तीन सदस्यीय आहे
एकूण 9,48,460 मतदारांमध्ये 5,16,267 पुरुष, 4,32,040 महिला आणि 153 इतर मतदार आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका मतदाराला चार उमेदवारांना (एका प्रभागात तीन) मतदान करावे लागणार आहे. यासाठी 1141 मतदान केंद्रे कार्यान्वित असणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 6,275 कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अनधिकृत बॅनर्स, राजकीय फलक, उद्घाटन-भूमिपूजनाच्या कोनशिला हटविण्याची धडक मोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. निवडणूक यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध विभाग प्रमुखांना समन्वय अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, माध्यम प्रतिनिधींनी मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले














Leave a Reply