नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या कालावधीत सर्व नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले आहेत. विभागप्रमुख व विभाग अधिकाऱ्यांच्या निवडणूकविषयक आढावा बैठकीदरम्यान त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे तसेच इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
15 डिसेंबरच्या सायंकाळपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेनुसार अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मालमत्तांवरील उद्घाटन, भूमिपूजन कोनशिला तसेच राजकीय व्यक्तींची नावे असलेले फलक झाकून घेण्याची कार्यवाही सुरू असून, ही प्रक्रिया 48 तासांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
निवडणूक सुमारे 30 दिवसांवर असल्याने या कालावधीत निवडणूक कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच मतदान केंद्रांच्या जागांची पुनर्पाहणी, मतदान केंद्रांवरील सुविधा, आणि सर्व मतदान केंद्रांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
तसेच डिस्ट्रिक्ट इलेक्शन प्लॅनच्या धर्तीवर वॉर्ड इलेक्शन प्लॅन तयार करण्याचे, दुबार मतदार यादीची तपासणी जलद व अचूक पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय राखून प्रक्रिया सुलभ करण्यावर भर द्यावा, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित इतर प्राधिकरणांचे अधिकारी, राजकीय पक्ष प्रतिनिधी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढील बैठका आयोजित केल्या जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.














Leave a Reply