नवी मुंबईतील नेरुळ येथील विद्याभवन शाळेत संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील सराव परीक्षा 2025-26’ या उपक्रमाच्या प्रश्नपत्रिका संचाचे प्रकाशन व वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या शैक्षणिक उपक्रमाने यंदा 27 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते प्रश्नपत्रिका संचाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.
यंदा नवी मुंबईतील 54 परीक्षा केंद्रांवरून सुमारे 9,000 विद्यार्थी ही सराव परीक्षा देणार असून, विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरणार आहे. या प्रश्नपत्रिका संचाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला QR कोड, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे त्वरित उपलब्ध होणार असून, स्वतःच्या उत्तरांचे मूल्यांकन करणे अधिक सुलभ होणार आहे.
या कार्यक्रमाला पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अविनाश कुलकर्णी आणि मनोज महाजन, मुख्याध्यापक अशोक सोनवणे, रवींद्र भोईर, मुख्याध्यापिका श्रीजा नायर, सुनील पाटील, प्रताप महाडिक, दत्ता घोडके यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी सांगितले की, बोर्ड परीक्षेची भीती कमी करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील सराव परीक्षा हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरत आहे. यावर्षी अधिक उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण प्रश्नपत्रिका संच तयार करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत निश्चितच चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, नवी मुंबईचा विकास सर्वच क्षेत्रात वेगाने होत असून शिक्षण क्षेत्रातही हे शहर अग्रस्थानी राहील. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांनी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ही सराव परीक्षा केवळ एक परीक्षा नसून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला योग्य दिशा देणारे एक वरदान ठरत आहे.














Leave a Reply