महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशी प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आणि नागरी विकासकामांचे उद्घाटन संपन्न झाले. हे उपक्रम माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांच्या माध्यमातून राबवण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध नागरी कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा, मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, मोफत आयुष्यमान कार्ड वाटप तसेच विशेषतः वाशी विभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या उत्कर्षासाठी सेवा मंडळांची स्थापना असे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडले.
या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक संपत शेवाळे, शशिकांत राऊत, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, विविध समाजसेवक आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गणेश नाईक यांनी वाळुंज लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. जनतेसाठी काम करण्याची त्यांची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न पाहता हा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना विजय वाळुंज यांनी सांगितले की, प्रभागाचे नेतृत्व करताना नागरिकांना दिलेले प्रत्येक आश्वासन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. नागरिकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वास यांना केंद्रस्थानी ठेवूनच हे उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, कमी कालावधीत नागरिकांनी मोठ्या संख्येने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या दिशेवर व्यक्त केलेला दृढ विश्वास आहे. नागरिकांचा हा विश्वास आणि साथ हीच पुढील वाटचालीसाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.














Leave a Reply