माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲड. भारती पाटील यांच्या सातत्यपूर्ण व अथक पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 12, सेक्टर 15 येथील नागरिकांची एक अत्यंत महत्त्वाची व दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास गेली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी वाहतूक समस्या लक्षात घेता, गुलाबसन्स डेअरी ते सेक्टर 7 रिक्षा स्टँड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉक (पादचारी पूल) कामाचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला.
महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणे ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. या प्रसंगी समाजसेवक संदीप म्हात्रे, दाजी सणस, नारायण शिंदे, किशोर पाटील यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जानेवारी 2019 पासून पाटील लोकप्रतिनिधींनी या स्कायवॉकची मागणी सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे लावून धरली होती. याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या महासभेतही ही मागणी ठामपणे मांडण्यात आली होती. कोपरखैरणे रेल्वे स्थानकाला सेक्टर 5 ते 8, 15 ते 18, 22 आणि 23 या भागांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने येथे बाजारपेठा, शाळा, मैदाने असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते.
वाढती लोकसंख्या आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे हा रस्ता ओलांडताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत ठेवावा लागत होता. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या या स्कायवॉकला अखेर मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲड. भारती पाटील यांच्या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला.














Leave a Reply