नवी मुंबईतील कोपरी गावात भक्ती आणि समाजकार्य यांचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. ज्येष्ठ समाजसेवक परशुराम ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘गजर हरिनामाचा, जागर स्वच्छतेचा’ हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून, कोपरी गावाला आदर्श गावाची ओळख मिळवून देत आहे.
धार्मिक सप्ताहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, परशुराम ठाकूर यांनी ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबतची जबाबदारी आणि जागरूकता रुजवली आहे. हरिनाम सप्ताहातील पहिल्या रविवारी दरवर्षी ‘स्वच्छ कोपरी गाव अभियान’ राबविले जाते. याच अभियानांतर्गत यंदाही मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना मोफत डस्टबीनचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवण्याचा ठोस संदेश देण्यात आला असून, नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती संस्कृतीचा भाग व्हावा, हा विचार या उपक्रमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.
या वेळी अक्षय ठाकूर, केशव ठाकूर, दिनकर नवरे, राजकुमार क्षीरसागर, अथर्व ठाकूर, संतोष देवकर, किशोर पाटील, दीपक पाटील, रवींद्र ससाणे, उमेश सिन्हा, विजय अडसूळ, आदित्य अंगारखे, प्रशांत उत्तेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी परशुराम ठाकूर यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करत सांगितले की, धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपली तर कोणतेही गाव आदर्श गाव बनू शकते. त्यांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे कोपरी गाव स्वच्छतेच्या बाबतीत एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.














Leave a Reply