नेरुळ प्रभाग 23 मध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धा व ‘माऊली कृपा’ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

नेरुळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस आणि माजी नगरसेविका श्रद्धा गवस यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमाला परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे ऐतिहासिक किल्ले साकारले.

या कार्यक्रमादरम्यान गवस लोकप्रतिनिधींच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले असून, इतिहास आणि संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक दृढ झाले. स्थानिक पातळीवर सकारात्मकता वाढवणारा हा उपक्रम विशेष ठरला.

याच सोहळ्याच्या निमित्ताने ‘माऊली कृपा’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. ही दिनदर्शिका प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांच्या घरोघरी पोहोचणार असून, नगरसेवक पदाच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली विविध विकासकामे, कोरोना महामारीच्या काळात गरजूंसाठी केलेली मदत, तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे स्मरण नागरिकांना करून देणारी ठरणार आहे.

ही दिनदर्शिका केवळ कालगणनेपुरती मर्यादित न राहता, जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची भावना वर्षभर जागृत ठेवणारी स्मृतिकोश ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी प्रदीप गवस यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना, अशा उपक्रमांमधून पुढील पिढीमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव आणि समाजाशी बांधिलकी निर्माण होत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *