सिडको आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लार्सन ॲण्ड टुब्रो प्रस्तुत ‘सिडको ओपन 2025’ या आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा 16 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत नवी मुंबईतील खारघर व्हॅली गोल्फ कोर्स येथे पार पडणार असून, या स्पर्धेसाठी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजक शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) असून लार्सन ॲण्ड टुब्रो हे सादरकर्ते भागीदार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण 126 व्यावसायिक गोल्फपटू सहभागी होणार असून, चार फेऱ्यांमध्ये प्रत्येकी 18 होल्ससाठी स्ट्रोक-प्ले पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अव्वल 50 खेळाडू पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या गोल्फ कोर्सचा पार 72 आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत युवराज संधू, अर्जुन प्रसाद, मनु गंडास, अंगद चीमा, खालिन जोशी, ओम प्रकाश चौहान यांसारखे नामांकित भारतीय व्यावसायिक गोल्फपटू सहभागी होणार आहेत. तसेच श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, झेक प्रजासत्ताक, इटली, अमेरिका आणि युगांडा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूही या स्पर्धेत आपली गुणवत्ता सादर करणार आहेत.
स्थानिक गोल्फपटूंमध्ये नवी मुंबईतील मनोज कुमार, मयूर ठाकूर, पंकज ठाकूर तसेच मुंबईतील बजरंग माने यांचा सहभाग असणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, सिडको ओपन 2025 ही स्पर्धा सिडकोसाठी अभिमानाची बाब असून, उदयोन्मुख खेळाडूंना संधी देणे आणि गोल्फ खेळाला प्रोत्साहन देणे हा या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्सवर प्रथमच अशा स्तरावरील स्पर्धेचे आयोजन होत आहे.
PGTI चे अध्यक्ष कपिल देव यांनीही या स्पर्धेमुळे नवी मुंबईसह इतर भागांतील तरुण गोल्फपटूंना प्रेरणा मिळेल, तसेच देशात गोल्फ खेळाचा विस्तार होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.














Leave a Reply