वाशी सेक्टर 9 येथे शिवसेना प्रभाग क्रमांक 17 (नवी मुंबई महानगरपालिका) तर्फे आयोजित करण्यात आलेला बहुप्रतिक्षित ‘सखी फेस्टिवल 2025’ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. “आपली बोली, आपला बाणा” या घोषणेसह आयोजित या कार्यक्रमाला प्रभागातील विविध सेक्टरमधून आलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या वर्षी ‘जागर स्त्रीशक्तीचा – उत्सव एकनाथांचा’ ही विशेष थीम ठरली होती. जिल्हाप्रमुख किशोर अशोक पाटकर यांच्या पुढाकाराने आणि प्रभाग 17 मधील स्थानिक महिलांच्या सक्रिय सहभागातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सेक्टर 9 येथे हा भव्य सांस्कृतिक सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितू दादा आणि आशाताई यांचे ‘सखींनो खेळात जीव रंगला’ हे धमाल सादरीकरण. जितू दादांच्या उत्साही सूत्रसंचालनातून विविध खेळ, झटपट स्पर्धा आणि मनोरंजक उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे उपस्थित महिला अक्षरशः भारावून गेल्या. प्रत्येक स्पर्धेत आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
स्पर्धांमधील विजेत्यांना विशेष पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले. तसेच लकी ड्रॉ कूपन लॉटरीत भाग्यवान महिलांना सुंदर भेटवस्तू, तर लहान मुलांना त्यांच्या सादरीकरणानुसार रोख बक्षिसे देण्यात आली. विजेत्यांचा सत्कार जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, माजी उपमहापौर अविनाश लाड, वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड आणि प्रणाली लाड यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोरंजन, हास्य, सांस्कृतिक रंगत आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रभाग 17 मधील महिलांसाठी अविस्मरणीय ठरला.














Leave a Reply