नवी मुंबई महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांचा वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे खेळांचा आनंद घेता यावा आणि त्यांच्यातील सुप्त क्रीडा-कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने या क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
इटीसी केंद्राच्या प्रांगणात सकाळी 8 ते 12.30 या वेळेत हा क्रीडा दिन पार पडला. मानवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली आणि इटीसी केंद्र संचालक अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन ठाणे जिल्ह्यातील नामवंत मल्लखांब प्रशिक्षक किशोर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रीडा दिनात कर्णबधीर, मतिमंद, अंध व बहुविकलांग अशा विविध विभागांतील 2 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार करून धावणे, चमच्यावर लिंबू घेऊन चालणे, ससा उडी, टॉवर मेकिंग, सॉफ्ट थ्रो बॉल अशा खेळांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदके वितरित करण्यात आली. राजा कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन अँड रिसर्च येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षणार्थींनी पंच म्हणून काम पाहिले व त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, या क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इटीसी केंद्रातील सर्व कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.














Leave a Reply