नवी मुंबईत देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेना उभारण्याची सिडकोची प्रक्रिया सुरू

दूरदर्शी नगररचना आणि आधुनिक पायाभूत सुविधा यामुळे नवी मुंबईने देशातील नगर नियोजनाला नवी दिशा दिली आहे. जागतिक दर्जाचे शहर म्हणून उभारी घेत असलेल्या नवी मुंबईत आता देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेना उभारण्याच्या प्रक्रियेला सिडकोने अधिकृतरीत्या सुरुवात केली आहे. यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) दि. 9 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन उपलब्ध झाली असून, निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी सांगितले की नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र बनवणे हा सिडकोचा संकल्प असून या प्रकल्पाद्वारे देशात थेट करमणुकीची नवी क्रांती घडणार आहे. कलाकार, उद्योजक आणि स्थानिक उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असून नवी मुंबईचे जागतिक पातळीवरील स्थान अधिक बळकट होईल.

न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनमधील O2 अरेना यांपासून प्रेरणा घेऊन विकसित होणारा हा अरेना भारतातील करमणूक पायाभूत सुविधांना नवा आयाम देणार आहे. 20,000 प्रेक्षकांसाठी आसन क्षमता आणि 25,000 उभे प्रेक्षकांची सुविधा असलेला हा देशातील पहिला विशाल आणि जागतिक दर्जाचा इनडोअर अरेना असेल. येथे संगीत कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय क्रीडा इव्हेंट्स, सांस्कृतिक महोत्सव आणि immersive अनुभवांचे आयोजन शक्य होणार आहे.

नवी मुंबईत वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे हा प्रकल्प अधिक सक्षम बनतो:
• अटल सेतू, ट्रान्स-हार्बर लिंक, हाय-स्पीड रेल्वे मार्ग आणि नवी मुंबई मेट्रोमुळे अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध.
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, आंतरराष्ट्रीय कलाकारांचे परिवहन आणि मीडिया उत्पादनात क्रांतिकारी बदल.
• नेरूळ जेट्टीमुळे पर्यटन आणि चित्रपट निर्मितीच्या नवीन संधी.
• खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, FIFA मानकांच्या चार ग्राऊंड्स आणि 4,000 आसन क्षमतेचे स्टेडियम.
• 18 होल्सचा गोल्फ कोर्स — करमणूक व क्रीडा क्षेत्रातील नवी मुंबईचे स्थान मजबूत करणारा प्रकल्प.

सिडको उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित हितधारकांसोबत भागीदारी करून जागतिक दर्जाचे अनुभव, ज्ञान आणि ऑपरेशनल क्षमतेचा लाभ नवी मुंबईला देण्याचा प्रयत्न करत आहे. हा उपक्रम केवळ अरेना उभारण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक आणि आर्थिक चळवळीची नवी सुरुवात आहे.

या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, पर्यटनाला गती मिळेल आणि नवी मुंबई देशातील थेट करमणूक व जागतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. निविदा प्रक्रियेच्या सुरुवातीने सिडकोची दृष्टी आणि कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *