नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नागरी विकासकामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात कोपरखैरणे सेक्टर–5, सेक्टर–7 आणि सेक्टर–8 येथे नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या अत्यावश्यक कामांची सुरुवात करण्यात आली.
प्रभागातील वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. या प्रश्नाला प्राधान्य देत माजी नगरसेविका लता मढवी आणि युवा समाजसेवक रॉबिन मढवी यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या या समस्येवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे सहकार्य लाभले आणि त्यानंतर महानगरपालिकेने या कामांना तात्काळ मंजुरी दिली.
या कामामुळे नागरिकांची सांडपाण्याशी संबंधित दीर्घकालीन गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला सक्षम पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी या बहुप्रतिक्षित कामाला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि मढवी लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक शंकरजी मोरे, माजी नगरसेविका सायली शिंदे, संदीप म्हात्रे, भालचंद्र मढवी, दाजी सणस, नारायण शिंदे, रॉबिन मढवी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रभागातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने या अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मढवी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागले असून, त्यामुळे नागरिकांची अत्यंत गंभीर समस्या सुटणार आहे.
या शुभारंभानंतर युवा समाजसेवक रॉबिन मढवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रभागातील सेक्टर 5, 7 आणि 8 मध्ये सांडपाण्याची समस्या दीर्घकाळ प्रलंबित होती. नवीन मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामामुळे नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांनी सांगितले की हे काम प्रभागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवेल.














Leave a Reply