आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी, दिघा विभागाच्या वतीने दिघा तलाव ते महात्मा गांधी शाळा या मार्गावर *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ‘युनिटी मार्च’*चे आयोजन करण्यात आले. या मार्चमध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नवीन गवते, भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, युवा मोर्चा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सहभागी होत राष्ट्राची एकात्मता, ऐक्य आणि स्वावलंबनाचा संदेश दिला.
मार्चदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्मता, स्वावलंबन आणि राष्ट्रनिर्मितीतील कार्याचा गौरव करण्यात आला. ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
यानंतर दिघा बिंदुमाधव नगर येथील महात्मा गांधी शाळेत, भारतीय जनता पार्टी दिघा विभागाच्या वतीने, नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या पुढाकाराने मागील सात वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले, ज्यामुळे या उपक्रमाला अधिक भक्कम मान्यता लाभली.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड-किल्ल्यांची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. गवते लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली, पॅनल क्रमांक 1 आणि 2 मधील नऊ प्रभागांसाठी आयोजित या स्पर्धेत 75 हून अधिक स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. स्पर्धकांनी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती अत्यंत कल्पकतेने साकारल्या होत्या. विशेष म्हणजे, बहुसंख्य स्पर्धकांनी प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती उभारल्याने, कार्यक्रमादरम्यान ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या विषयावर पोवाडा सादर करण्यात आला आणि सभोवताली ऐतिहासिक ऊर्जा निर्माण झाली.
कार्यक्रमास आयोजक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, माजी नगरसेवक दीप गवते, समाजसेवक राजेश गवते, दिघा मंडळ भाजपा अध्यक्ष संतोष मुळे, भाजप युवा मोर्चा नवी मुंबई जिलाध्यक्ष अॅड. यशपाल ओहळ, समाजसेवक यल्लू शिंगे, सुरेंद्र पाल, दामोदर कोटियन, चंद्राम सोनकांबळे, तसेच दिघा मंडळ भाजप युवा अध्यक्ष सागर भंडारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून किल्ले स्पर्धेद्वारे मुलांमध्ये इतिहासाबद्दलची रूची वाढत असल्याचे कौतुक केले. तसेच, हा उपक्रम संस्कार, परंपरा आणि राष्ट्राभिमान जपणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे संयोजक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि अन्य लोकप्रतिनिधींनीही या स्पर्धेने सामाजिक बांधिलकी आणि ऐतिहासिक जाणीवा नव्या पिढीत दृढ करण्यास मोठे योगदान दिल्याचे सांगितले.














Leave a Reply