नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे.
सीवूड विभागातील उबाठा गटाचे सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.
वाशी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आणि बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ॲडव्होकेट कौस्तुभ मोरे, ॲडव्होकेट मंदार मोरे यांच्यासह उबाठा गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशाबद्दल बोलताना शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा म्हणाले, “उबाठा गटातील कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे नवी मुंबईत शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत या प्रवेशाचा पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार आहे.”
तर जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले की, “शिवसेनेच्या विकासाभिमुख आणि जनतेशी जोडलेल्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आज पक्षाच्या विचारधारेखाली येत आहेत, ही सकारात्मक घडामोड आहे.”
दरम्यान, पक्षात प्रवेश केल्यानंतर ॲडव्होकेट कौस्तुभ मोरे यांनी सांगितले की, “शिवसेना पक्षाच्या जनसेवेच्या विचारसरणीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून काम करू.”
या पक्षप्रवेशामुळे सीवूड विभागासह संपूर्ण नवी मुंबईतील शिवसेनेचा जनाधार आणखी दृढ झाला असून, आगामी मनपा निवडणुकीत या घडामोडीमुळे पक्षाला बळकटी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.














Leave a Reply