दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली असतानाच, वाशी सेक्टर १५ येथील मराठा भवन हॉलमध्ये मराठा समाज, नवी मुंबईतर्फे १३ ऑक्टोबर पासून भव्य ग्राहक मेळाव्याला सुरुवात झाली आहे. हा मेळावा १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन एमएसएमई (MSME) मुंबई विभाग अध्यक्ष अजय नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी प्रकाश नाईक, शशिकांत सुर्वे, कृष्णा सावंत, वसंत तरडे, रेखा कदम, प्रणाली कदम, सुनंदा राणे, उदय दळवी, विजय देशमुख, मंगला देशमुख, विजयलक्ष्मी मोरे, विजय वाळुंज, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, अजय वाळुंज, शामराव महाडिक, अमरजा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते तर मराठा समाजाच्या सांस्कृतिक मंडळ, महिला मंडळ आणि मुख्य कार्यकारणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घटनंतर मान्यवरांनी दिवाळीसाठी आवश्यक असलेले फराळ, आकर्षक कंदील, रांगोळीचे साहित्य, कपडे आणि विविध सजावटीच्या वस्तू अश्या विविध स्टॉल्सना भेटी दिल्या व महिला उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांची प्रशंसा केली आणि त्यांचे मनोबल वाढवले.
विशेष म्हणजे, हे प्रदर्शन तळागाळातील महिला उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. ज्या महिलांना महागड्या भाड्यांमुळे मोठ्या बाजारपेठा परवडत नाहीत, त्यांना संधी मिळावी म्हणून येथे अत्यंत कमी आणि वाजवी दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. जे या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे आणि उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. हे प्रदर्शन केवळ दोन-तीन दिवसांचे नसून, महिलांना जास्त वेळ मिळावा यासाठी तब्बल सात दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला उद्योजिका व्यावसायिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी याप्रसंगी उपस्थित अजय नाईक यांनी महिलांना विक्रीचे आणि मार्केटिंगचे अमूल्य मार्गदर्शन केले तर स्वतः अजय नाईक हे प्रदर्शनानंतरही स्वतः पुन्हा येऊन, प्रत्येक उद्योजिकेच्या विक्रीचा आणि अनुभवाचा सखोल आढावा घेणार आहेत. असा अनोखा आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा इतर कोणत्याही प्रदर्शनात होत नाही, हे मराठा समाजाच्या उपक्रमाचे मोठे यश आहे.
या मेळाव्यास यशस्वी आयोजनामध्ये मराठा समाजाची सांस्कृतिक कमिटी, महिला मंडळ आणि मुख्य कार्यकारणी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. महिलांना आर्थिक बळ देणारा आणि त्यांना उद्योजिका म्हणून घडवणारा हा नवी मुंबई मराठा समाजाचा उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .














Leave a Reply