कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित गज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांच्या ” तू नभातले तारे ” या गज़ल मैफलीस श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निमित्ताने शहरातील राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱया मान्यवरांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. याप्रसंगी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक , बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे , कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे औचित्य साधूनयांना वन मंत्री गणेश नाईक,आमदार मंदा म्हात्रे व कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुलेखनकार अच्युत पालव, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार प्राफ्त गज़लनवाज़ भीमराव पांचाळे व महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राफ्त नवी मुंबईतील पहिले मान्यवर सुभाष कुळकर्णी या व्यक्तिमत्वांना गौरविण्यात आले.
याशिवाय याप्रसंगी नवी मुंबई शहराच्या निर्मितीनंतर येथील सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात गत ४०-५० वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या व नवी मुंबईच्या जडण-घडणीत महत्त्वपुर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना देखील नवी मुंबई प्रेस क्लबच्यावतीने गौरविण्यात आले.
यामध्ये साहित्य, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारे डॉ. नंदरकिशोर जोशी, सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे ललित पाठक, महिला व बालकल्याण क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱया सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका प्रा. वृषाली मगदूम, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमठवणारे प्रमोद कर्नाड या गौरवमुर्तींचा समावेश होता.
याप्रसंगी गज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांनी सादर केलेल्या गज़लांना रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी सादर केलेल्या गज़लांना रसिकांनी मनमुराद दाद दिली आणि एका अविस्मरणीय सांस्कृतिक संमेलनाची सांगता झाली.














Leave a Reply