शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कोपरखैरणेचे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी कोपरखैरणे सेक्टर ७ नाका येथे नागरिकांच्या न्यायहक्कासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
प्रभागातील नागरिकांना होत असलेल्या विविध गैरसोयींबाबत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने रवींद्र म्हात्रे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
रवींद्र म्हात्रे यांनी आरोप केला की, यापूर्वी उपोषणादरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत कार्यवाहीचे आश्वासन दिले होते; मात्र ते न पाळल्यामुळे नागरिकांच्या न्यायासाठी त्यांनी हा लढा पुन्हा सुरू केला आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये —
- कोपरखैरणे सेक्टर ७ ते १५ दरम्यान पादचारी पुलाची तातडीची उभारणी,
- वाढलेले अनधिकृत फेरीवाले आणि अवैध पार्किंग हटवणे,
- डी-मार्ट समोरील ई-टॉयलेट पुन्हा बसवणे,
- तसेच कंडोमिनियम अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व पाण्याच्या पाईपलाईनची प्रलंबित कामे पूर्ण करणे — या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, सेक्टर ५ मधील उद्यानात खेळणी आणि सीसीटीव्ही बसवणे, बंद असलेले अहिल्याबाई होळकर माता-बाल रुग्णालय पुन्हा सुरू करणे, तसेच रा. फ. नाईक शाळेमागील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा रवींद्र म्हात्रे यांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.














Leave a Reply