नवी मुंबईतील पामबीच मार्गावर धावणे हे प्रत्येक धावपटूचे एक स्वप्न असते त्यामुळे सिटी हेल्थ रनला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच विविध खेळांना प्राधान्य देणारे शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ होत असल्याचे सांगितले. धावणे हा एक उत्तम व्यायाम असून यामुळे शारीरिक तंदुरूस्ती सोबतच मानसिक आरोग्यही चांगले राहते असा स्वानुभव असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिध्द कॉम्रेड रनमध्ये आयुक्त दोनदा सहभागी झाले असून धावण्यामुळे मेंदू व मनाचा व्यायाम होतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे रनकडे केवळ धावणे म्हणून न पाहता सर्वसमावेशक व्यायाम म्हणून पाहतो असे ते म्हणाले.
सकाळ वृत्तपत्र समुहाच्या वतीने इंडिया रनींग या नामांकित संस्थांच्या सहयोगाने पामबीच मार्गावर आयोजित 10 किमी, 5 किमी व 3 किमी ‘नवी मुंबई सिटी हेल्थ रन’ प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी सकाळचे मुख्य संपादक श्री.राहुल गडपाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बिग बॉस मराठी विजेते नृत्यदिग्दर्शक शिव ठाकरे, सुप्रसिध्द अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेते राहुल पेठे व करण परब आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यापुढील काळात नवी मुंबईत विविध क्रीडा प्रकारांना संधी देणारे उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे व त्यासोबतच निरनिराळ्या खेळांना पोषक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अशा स्पर्धांतूनच उद्याचे ऑलिंपिकपटू घडतील असा विश्वास व्यक्त केला. या रनमध्ये नवी मुंबई प्रमाणेच इतर शहरांतूनही नियमित धावण्याचा सराव करणारे उत्साही धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल तसेच 10 किमीचे अंतर 39 मिनीटात पूर्ण करणारे यशस्वी उत्तम धावपटू रनमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेचे सहा.आयुक्त जयंत जावडेकर तसेच उपअभियंता गजानन पुरी व माजी उपआयुक्त शरद पवार यांनी 10 किमी रनमध्ये सहभागी होत यशस्वीपणे अंतर पूर्ण केले. त्यांच्यासह सर्वच विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका या नवी मुंबई सिटी हेल्थ रनमध्ये स्वच्छतेचा आरोग्याशी असलेला परस्पर संबंध लक्षात घेऊन सहभागी झाली होती. या माध्यमातून उपस्थित धावपटूंमध्ये स्वच्छतेच्या सवयी नियमितपणे अंगिकारण्याचा संदेश व्यापक स्वरूपात प्रसारित करण्यात आला.














Leave a Reply