दक्षिणोत्तर पसरलेल्या नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला विस्तृत सागरी खाडी किनारा लाभलेला आहे. त्या अनुषंगाने आज आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने किनारा व खारफुटी परिसरात स्वच्छतेच्या विशेष मोहीमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिस-या शनिवारी ‘आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन’ जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त आज 1 हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, विविध विभागांतील खाडीकिनारी आयोजित या मोहीमांमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांनी प्रत्यक्ष सहभागी होत मोहीमांतील सक्रिय सहभागी विद्यार्थी व नागरिकांचा उत्साह वाढविला. सर्व मोहीमांच्या आयोजनात मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व सर्व विभागांचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक यांचे महत्वाचे योगदान लाभले .
यामध्ये बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री.नरेश अंधेर यांच्या माध्यमातून दिवाळे गांव जेट्टी आणि डोलाया सागरी किनारा अशा दोन ठिकाणी लोकसहभागावर भर देत सागरी किनारी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या.
यामध्ये दिवाळे गाव जेट्टी येथील मोहीमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांचेसह एनसीआरडी स्टर्लिंग कॉलेज नेरूळ, विद्या उत्कर्ष मंडळाचे महाविद्यालय बेलापूर, एमजीएम कॉलेज कामोठे, टिळक कॉलेज नेरूळ, भारती विद्यापीठ इंजि. कॉलेज खारघर, सरस्वती इंजि. कॉलेज खारघर येथील एनएसएस युनिटचे विद्यार्थी व विभागातील स्वच्छताप्रेमी नागरिक 250 हून अधिक संख्येने सहभागी होते.
त्याचप्रमाणे करावे चाणक्य जवळील डोलाया सागरी किनारा शिवमंदिर परिसरातही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी एसआयईएस कॉलेज नेरूळ यांचे एनएसएस युनिट, डीएलएलई एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, एसओओई महाविद्यालयाचे एनएसएस युनीट, एमजीएम सीईटीचे एनएसएस युनीट, डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, सकलीवाल फाऊंडेशन कॉलेज येथील विद्यार्थी व नागरिक असे 250 हून अधिक स्वच्छताप्रेमी सक्रिय सहभागी झाले होते.
अशाच प्रकारची मोहीम सेक्टर 8 वाशी येथे सहा.आयुक्त श्री.सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी श्रीम.जयश्री आढळ यांच्या माध्यमातून विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांच्या सहभागातून सागर विहार परिसरात राबविण्यात आली. याठिकाणीही मोहीमेत सहभागी युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ॲग्नेल स्कुल ऑफ लॉ वाशी येथील एनएसएस युनिटचे विद्यार्थी, टिळक कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे विद्यार्थी यांच्यासह त्यांचे ग्रीन क्लब, रोटरी क्लब यांचेही पदाधिकारी, सदस्य या मोहीमेत नागरिकांसह 250 पेक्षा अधिक संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
नेरूळ येथील सखोल स्वच्छता मोहीम सारसोळे जेटी सागर किनारा परिसरात सहा.आयुक्त श्री.जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री.अरूण पाटील यांच्या माध्यमातून विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी यांच्यासह राबविण्यात आली. यामध्ये एचडीएफसी बँक नेरूळ व दुर्गा फाऊंडेशन यांचे सदस्य व नागरिक 200 हून अधिक संख्येने सहभागी झाले होते.
ऐरोली विभागात सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे व स्वच्छता अधिकारी श्रीम.सुषमा देवधर यांच्या माध्यमातून मुलुंड काटई ब्रिजखाली सेक्टर 10 ते 14 या परिसरात राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत सागरी सेवा संघाचे सदस्य तसेच सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयातील 150 हून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने दि.17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या पंधरवडा कालावधी जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा 2025’ अभियानामध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका दररोज स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबवित असून त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.














Leave a Reply