नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व 165 विसर्जनस्थळी केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. 22 नैसर्गिक व 143 कृत्रिम विसर्जनस्थळी यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या सांगता दिवशी 9929 घरगुती व 749 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 10678 श्रीगणेशमूर्तींचे “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीमूर्तींवर परंपरेनुसार पुष्पवृष्टी
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या मोठ्या व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करीत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला तसेच श्रीगणेशभक्तांचे स्वागत केले.* याप्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे व इतर विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक व अनेक माजी नगरसेवक यांनी व्यासपीठास भेट दिली.
सकाळपासूनच पावसाचा जोर असूनही नागरिक मोठ्या उत्साहाने या विसर्जन सोहळ्यात सहभाग झाले होते. पहाटे 5.30 पर्यंत चाललेल्या या विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अथक कार्यरत होती. सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होते अशा कोपरखैरणे धारण तलावावरील यांत्रिकी तराफा, फोर्कलिफ्ट व क्रेन सुविधेची पाहणी केली तसेच इतर विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांना भेटी देत व्यवस्थेची पाहणी केली होती आणि मौलिक सूचना केल्या. या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली.
- कृत्रिम तलावातील विसर्जनास प्राधान्य देऊन नवी मुंबईकरांनी जपला पर्यावरणपूरक दृष्टीकोन.
- शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा ‘पर्यावरणमित्र’प्रशस्तिपत्राने सन्मान
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटांपर्यंतच्या उंच मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे या आयुक्तांनी केलेल्या आवाहनास अनुसरून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात विसर्जन करीत पर्यावरणशील दृष्टीकोन जपला. पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनासही शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशा नागरिकांना आकर्षक कागदी पिशवीसह आयुक्तांच्या स्वाक्षरीचे ‘पर्यावरणमित्र’ असे प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने सर्व विसर्जन स्थळांवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षम व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे पहाटे 5.30 वाजेपर्यंत चाललेला हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
कृत्रिम तलाव व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिका यंत्रणा सुसज्जतेने कार्यरत
विसर्जन व्यवस्थेंतर्गत सर्व 143 कृत्रिम तलावांवर स्वयंसेवकांसह सुयोग्य व्यवस्था होती. तसेच 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स तसेच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत होते. पोलीस यंत्रणा सर्व विसर्जन स्थळे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती. सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले होते. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट तसेच क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले होते व विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी व प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. भक्तजनांना श्रीमूर्तींची निरोपाची आरती व सांगता पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी टेबलची व्यवस्थित मांडणी करण्यात आली होती. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून सर्व विसर्जन स्थळांवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले.
स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था – निर्माल्यापासून खतनिर्मिती
नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” टाकण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे 14 टन 70 किलो संकलित निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेण्यात आले. त्याचे पावित्र्य जपत त्यावर खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.
नमुंमपा क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 4361 घरगुती तसेच 734 सार्वजनिक मंडळांच्या 5095 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 143 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 5568 घरगुती तसेच 15 सार्वजनिक मंडळांच्या 5583 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 9929 घरगुती व 749 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10678 श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन अनंतचतुर्दशीदिनी सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 1966 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
- बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 45 घरगुती व 09 सार्वजनिक तसेच 21 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1538 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
- नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 499 घरगुती व 42 सार्वजनिक तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 562 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
- वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 741 घरगुती व 85 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 164 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
- तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 561 घरगुती व 192 सार्वजनिक तसेच 21 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 282 घरगुती व 4 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले.
- कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 295 घरगुती व 113 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1072 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
- घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1870 घरगुती व 263 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1077 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
- ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 178 घरगुती व 08 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 476 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
- दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 172 घरगुती व 22 सार्वजनिक तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 397 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 165 विसर्जन स्थळांवर 10678 श्रीगणेशमूर्तींना भावभक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 25 जुलै रोजीच गणेशोत्सवासंबधी संबंधित प्राधिकरणे व नागरिकांच्या आढावा बैठकीप्रसंगी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने 6 फूटांपर्यंतच्या उंच मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात या आदेशानुसार नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच विसर्जन करता यावे यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 143 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली.*
नागरिकांकडून मिळालेल्या उत्तम सहकार्यामुळे यावर्षीचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील पध्दतीने उत्तमरित्या निर्विघ्नपणे पार पडला असून याबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे व आभारही मानले आहेत.














Leave a Reply