64 कलांचा अधिपती असणा-या श्रीगणेशाचा उत्सव विविध कलांच्या सादरीकरणातून साजरा व्हावा या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेला ‘कलागणेश महोत्सव’ रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीने भरलेल्या विष्णुदास भावे नाटयगृहात जल्लोषात संपन्न झाला. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यतम कलागणेश महोत्सवाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या शुभहस्ते श्रीगणेश प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला.
‘सारेगमप संगीत स्पर्धा’ विजेते सुप्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सादर केलेल्या सुरेल गणेशगीतांनी व भक्तीगीतांनी वातावरण भारुन टाकले. निरुपक विघ्नेश जोशी यांनी समर्पक निवेदन केले.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्वरयात्रा सुरु असतांना रंगमंचावर चित्रकार सागर जाधव यांनी कॅनव्हॉसवर श्रीगणेशप्रतिमा चित्रांकित केली तसेच शिल्पकार श्री. अथर्व मोरे यांनी शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती निर्माण केली. या दोन्ही कलाकृती आयुक्त डॉ.कैलास शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कलावंतांकडून स्विकार केल्या.
या कलागणेश महोत्सवांतर्गत विष्णुदास भावे नाटयगृहात बेलापूर ते दिघा अशा आठ विभागांमध्ये विस्तारलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेसह आठही विभागांच्या नावांतून सुलेखनकार श्री.आशिष तांबे यांनी साकारलेल्या नऊ गणेश प्रतिमांचे ‘अक्षरगणेश’ हे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या नावातूनही त्यांनी गणेशप्रतिमा चित्रांकित करुन सर्वांचीच दाद घेतली.
याठिकाणी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने कार्यान्वित वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून निर्माण केलेल्या आकर्षक साहित्याच्या प्रदर्शनासही उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभात ट्रस्टच्या महिला बचत गटाने निर्माण केलेल्या बीज मोदक स्टॉलचीही प्रशंसा झाली. रसिकांना जाताना बीजमोदक व कागडी पिशवी स्नेहभेट देण्यात आली. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी कलागणेश महोत्सवाच्या चितारलेल्या आकर्षक रांगोळी समवेत अनेकांनी सेल्फी काढून घेतले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 92 कुकशेत, शाळा क्रमांक 46 गोठीवली व शाळा क्रमांक 94 कोपरखैरणे या 3 शाळांच्या विद्यार्थी नृत्यसमुहाने तसेच शिवकन्या मंगळागौर समुहाने अप्रतिम नृत्य सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. उपआयुक्त श्रीम.अभिलाषा पाटील यांच्या माध्यमातून क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत या कलागणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित रसिकांशी संवाद साधतांना महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी राज्य महोत्सवाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वांना एकत्र घेऊन भव्य स्वरुपात कलागणेश महोत्सव आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. श्रीगणपती पासून अनेक गोष्टी अंगिकारण्यासारख्या असून लंबोदर म्हणजे आपल्या आकाराने मोठया पोटात अनेक अपराध सामावून घेणारा क्षमाशील, मोठया कानांव्दारे ग्रहणक्षमता मोठी ठेवण्याची शिकवण देणारा अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. आज बदलत्या वातावरणानुसार आपण उत्सवही पर्यावरणाची काळजी घेत साजरे करण्याची गरज विशद करीत मंत्री महोदयांनी आगामी पाच वर्षांत राज्यात 250 कोटी वृक्षारोपण करण्याचा नियोजनबध्द आराखडा असल्याचे सांगितले.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकतेची भावना रुजते असे सांगत गणेशोत्सव हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनजागृतीचे मोठे माध्यम असल्याचे सांगितले. आपण आपल्या घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करुन पर्यावरणशील दृष्टीकोन जपल्याचे सांगत प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने दैनंदिन जीवनात आपल्या कृतीतून पर्यावरण जपले पाहिजे असे त्या म्हणाल्या. गणेशोत्सव मंडळांनी आकाराने मोठया मूर्तीपेक्षा पाच फूटापर्यंतच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे असे आवाहन करतांनाच महानगरपालिकेनेही अशा मंडळांना प्रोत्साहित करावे अशी सूचना त्यांनी केली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यमंत्री महोदयांनी श्रीगणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ म्हणून जाहीर केल्यानंतर कोणत्याही चांगल्या कामात पुढाकार घेणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सहभागातून हा ‘कलागणेश महोत्सव’ आयोजित केल्याचे सांगत नागरिकांची महोत्सवात इतक्या मोठया संख्येने उपस्थिती समाधान देणारी असल्याचे मत व्यक्त केले. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्ती कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जित कराव्यात याकरिता महानगरपालिकेने विविध भागात 143 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलाव निर्माण केले व नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन केले व आभार मानले. नवी मुंबई म्हणजे स्वच्छता हे समीकरण झाले असून माझी वसुंधरा अभियानातही आपण उत्तम कामगिरी करीत असल्याचे सांगत आयुक्तांनी ‘पर्यावरणशील व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी केलेल्या आवाहनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रशंसा केली.
नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य महोत्सवाचा भाग म्हणून कलागणेश महोत्सवाचे आयोजन करीत गायन, नृत्य, चित्र, शिल्प, सुलेखन, हस्तकला अशा विविध कलांना सामावून घेणारा अभिनव उपक्रम अतिशय उत्तम रितीने आयोजित केल्याबद्दल भरगच्च गर्दींने भरलेल्या विष्णुदास भावे नाटयगृहातील रसिकांनी मुक्तकंठाने कौतुक केले.














Leave a Reply