“गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा ” गणरायाचे विसर्जन ठरले खास – पारंपारिक पद्धतीने गणरायाला निरोप | Ganesh Visarjan 2025


दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि वाशीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १६ ए, मंडळाच्या “गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा” या थीमवर श्री गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.

यावर्षी मंडळाने काढलेली वैभवशाली विसर्जन मिरवणूक नवी मुंबईकरांना एक वेगळाच अनुभव देऊन गेली. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने काढलेल्या या विसर्जन मिरवणुकीत टाळ, मृदंग आणि वीणेच्या भक्तिमय निनादात वारकरी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत होते. भगव्या ध्वजांची उंच फडकणारी छटा आणि बाप्पाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी आणि वारकऱ्यांच्या विविध कला सादरीकरणांनी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे दृश्य अधिक विलोभनीय बनले होते.

गेले दहा दिवस बाप्पाच्या सेवेत प्रत्येकजण समर्पित होता. आरती, भजन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांनी मंडळाचा परिसर भक्तिमय झालेला होता. बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते. पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने या भावुक वातावरणातही उत्साह कायम राहिला.

या वर्षी मंडळाने नवी मुंबईतील सर्वात मोठा जंगल सफारी दृश्य उभारले होते. मंडळाने पर्यावरणावर विशेष भर देत जंगली प्राण्यांच्या संवर्धनाची जागृती करत ‘सेव्ह वाइल्ड लाईफ’ हा पर्यावरणपूरक संदेश दिला, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले.

अशाप्रकारे, सामाजिक संदेश आणि पारंपरिक वारकरी पद्धतीचा सुरेख संगम साधत, “गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा” या थीमवर गणरायाची विसर्जन मिरवणूक अविस्मरणीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *