मोरबे धरण 100 टक्के भरल्याने नवी मुंबई जलसंपन्न – आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले नागरिकांचे अभिनंदन

मागील सहा दिवसांपासू सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले असून आज 20 ऑगस्ट रोजी पहाटे 3.10 वा. 1123 क्यूसेक पाणी विसर्ग करण्यात आला. आहे. निसर्गाच्या कृपेने नवी मुंबईला लाभलेल्या या जलसंपन्नतेबद्दल आनंद व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

            स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेल्या 450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमता असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3.10 वाजता मोरबे धरणाचे 12 मी. × 3 मी. आकाराचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले व 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला. मोरबे धरण क्षेत्रात रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढलेले असून दुपारपासून 3114 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.

              मागील वर्षी 29 ऑगस्ट 2024 रोजी मोरबे धरण 100 % भरले होते, यावर्षी त्यापूर्वी 20 ऑगस्ट रोजीच मोरबे धरण पूर्ण क्षमतेने 100 % भरले आहे. यावर्षी धरण क्षेत्रात आजतागायत 3339.40 मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटर इतकी भरलेली आहे.

              धरणात 190.89 द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून धरण तुडूंब भरल्यानंतर त्यामधील पाण्याचा आज विसर्ग करण्यात आला. धरण पूर्ण भरण्याच्या वेळेपूर्वीच रायगड जिल्हाधिकारी, खालापूर तहसिलदार, कर्जत उपविभागीय अधिकारी, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांस पत्राव्दारे धावरी नदीच्या तीरावरील चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगांव, आसरोटी, कोपरी, या नदी काठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावातील संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील व व गावातील धरणाचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना निर्गमित करण्याची विनंती करण्यात आलेली होती. त्यानुसार उचित कार्यवाही करण्यात आली. धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे जाहीर आवाहनही स्थानिक रहिवाशांना करण्यात आले आहे.

              मोरबे धरणामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असला तरी सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहनही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *