उमलत्या संस्कारक्षम अशा लहान वयापासूनच मुलांच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार करण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका विविध कल्पक उपक्रम राबवून करीत असते. अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘ड्राय वेस्ट बँक’ हा आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या घरातील सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय लागावी व त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्व स्वकृतीतून पटावे आणि त्यांच्या पालकांपर्यंतही पोहचावे यादृष्टीने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमार्फत प्लास्टिक बॉटल, चीप्स अथवा चॉकलेटचे कव्हर, टेट्रापॅक अथवा टिन, काचेच्या बाटल्या, घरगुती प्लास्टिक आठवड्यातून एक दिवस शाळेत जमा करण्यात येतात व त्याचे पॉईंट्स देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी जितक्या प्रमाणात वस्तू जमा केल्या त्या प्रमाणात त्यांना पॉईंट्स देण्यात येत असून ते पॉईंट्स नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ड्राय वेस्ट पासबुक’ देण्यात आलेले आहे. या पासबुकमध्ये वर्गशिक्षकांमार्फत त्यांनी जमा केलेल्या सुक्या कच-याच्या प्रमाणात देण्यात येणारे पॉईंट्स नोंदवून ठेवले जातात.
अशाप्रकारे सर्वाधिक पॉईंट्स मिळविणा-या 3 विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ‘भक्तिरंग’ या विशेष कार्यक्रमप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘शून्य प्लास्टिकची सुरूवात माझ्यापासून’ – हा विश्वास मुलांमध्ये जागविणारा आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणारा आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांवर स्वच्छता आणि प्लास्टिक प्रतिबंधाचे संस्कार करणारा आहे. यामध्ये नमुंमपा शाळा क्र. 10 नेरूळगावचा विद्यार्थी यश साठे याला सर्वाधिक पॉईंट्स मिळविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्दितीय क्रमांक नमुंमपा शाळा क्र.107 तुर्भेगाव येथील अर्जुन धोंडी या विद्यार्थ्याने तसेच तृतीय क्रमांक नमुंमपा शाळा क्र. 117 दिवाळेगावची विद्यार्थिनी आर्या सिंग हिने पटकाविला. विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात चित्रकला साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी आयुक्त महोदयांसमवेत श्रीम.रेवती कैलास शिंदे तसेच अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, समाजविकास उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम. स्मिता काळे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थीदशेपासूनच नवी मुंबईतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या मनावर नकळतपणे कचरा वर्गीकरणाचे संस्कार व्हावेत व शाळेतील मूल्य संस्कारांमध्ये स्वच्छतेच्या संस्काराचाही समावेश व्हावा यादृष्टीने ‘ड्राय वेस्ट बँक’ हा अत्यंत आगळा वेगळा उपक्रम असून याला शाळेतील मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांचेही प्रोत्साहक सहकार्य लाभत आहे.














Leave a Reply