श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने नुकतेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यामध्ये महापालिका मुख्यालयानजीकच्या पसायदानातील ओव्यांनी सुशोभित केलेल्या चित्रकविता भिंतीपासून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत अधिकारी ,कर्मचारी , नागरिक , सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व इतर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्वजण तल्लीन झाले होते, ज्यामुळे एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
दिंडीची सांगता महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये ‘भक्तिरंग’ या अभंग व भक्तीगीत गानसंध्येने झाली. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अभंग व भक्तीगीते सादर केली. ‘
जय जय राम कृष्ण हरी’ या नामगजराने सुरू झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक तल्लीन झाले. बोरगावकर यांनी रसिकांनाही गाण्यात सहभागी करून घेतले, ज्यामुळे मुख्यालयातच पंढरी आणि आळंदी अवतरल्याचा भास झाला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गायक गात असतानाच चित्रकार सागर जाधव यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे पोट्रेट तयार केले. अशा प्रकारे, ‘भक्तिरंग’ स्वरयात्रेतून नवी मुंबई महानगरपालिकेने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना एक अविस्मरणीय स्वरमयी अभिवादन केले.














Leave a Reply