नवी मुंबई, तुर्भे गावातील शांता महिला मंडळ बहुउद्देशीय इमारतीत श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेच्या वतीने ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. माजी नगरसेवक रामचंद्र घरत आणि माजी नगरसेसेविका विजया घरत यांच्या माध्यमातून तुर्भे येथे पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महिलांनी पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचे सुंदर सादरीकरण केले. त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन आणि पारंपरिक संस्कृतीची झलक यावेळी पाहायला मिळाली. आपली परंपरा, संस्कृती जपत …अतिशय सुंदररित्या महिलांनी आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सादर करत सामाजिक संदेश देखील दिला .ज्यामुळे हा कार्यक्रम एक संस्मरणीय सांस्कृतिक सोहळा ठरला.
या कार्यक्रमाला आयोजक श्री विठाई प्रबोधन सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक माजी नगरसेवक रामचंद्र घरत, संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेविका विजया घरत, आणि उत्सव कमिटी अध्यक्ष दुर्गा ढोक यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, समाजसेविका अश्विनी घंगाळे, कल्पना छत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा लावणी सम्राट आशिमिक कामठे आणि अभिनेत्री डॉ. सपना देवळे यांनी पर्यवेक्षक म्हणून विशेष उपस्थिती लावली.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत नारीशक्ती महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर वाशीचा राजा मंडळाला द्वितीय आणि राजमाता जिजाऊ मंडळाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर रोहिणी माने यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘श्रावणी साज’ देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या इतर सर्व संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
या सोबतच कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकली.
याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रामचंद्र घरत यांनी सांगितले की, ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’ स्पर्धेमागे महिलांना एकत्र आणून त्यांना त्यांच्या दैनंदिन कामातून थोडा विसावा देणे हा मुख्य उद्देश होता आणि या स्पर्धेस मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी जाहीर केले की, आगामी तुर्भे महोत्सवामध्ये आतापर्यंत झाला नाही असा भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्याची त्यांची संकल्पना असून, लवकरच त्याचे नियोजन केले जाईल.














Leave a Reply