उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई युवा सेनेच्या वतीने गावठाण भागात सुरू झालेल्या ‘स्वच्छ परिसर अभियान – डीप क्लीन ड्राईव्ह’चा चौथा टप्पा शिरवणे गावात यशस्वीरित्या पार पडला.
नवी मुंबईतील गावठाणांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे ‘स्वच्छ परिसर अभियान आता एकापाठोपाठ एक गावांमध्ये पोहोचत आहे. युवासेना बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवणे गावात या अभियानाचा चौथा टप्पा राबविण्यात आला.
या मोहिमेत स्वतः माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह सुजाता सुतार , प्रतिभा सुतार ,जयवंत भोईर , वैभव भोईर , विक्रम म्हात्रे , सूर्यकांत पाटील , नारायण परेकर , शिरवणे गावातील ग्रामस्थ , युवासेनेची संपूर्ण टीम , स्थानिक नागरिक , महिला मैदानात उतरून या अभियानात सहभागी झाले होते . नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारीही या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले. सर्वांनी मिळून गावातील गल्लीबोळांतील कचरा, सार्वजनिक ठिकाणी साचलेली घाण आणि आरोग्याला धोकादायक असलेल्या वस्तूंची साफसफाई केली.
या अभियानामुळे शिरवणे गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटले असून, यापुढेही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हा उपक्रम केवळ तात्पुरता कचरा साफ करणारा नसून, एक व्यापक सामाजिक संदेश देणारा ठरत आहे.














Leave a Reply