नवी दिल्ली, ३० जुलै:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत आगामी हप्त्याच्या वितरणाच्या कार्यक्रमाची तयारी, आयोजन आणि शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (KVKs), विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक आणि अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (virtual) सहभागी झाले.
केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी यावेळी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ६००० रुपयांची वार्षिक रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरित केली जाते. यामध्ये प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचवण्याचा उद्देश आहे.”
२ ऑगस्टला वाराणसीत मुख्य कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, देशभरात राज्य, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर याचे थेट प्रसारण आणि अनुषंगिक कार्यक्रम राबवले जातील. ‘उत्सव आणि मिशन’ स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचे मंत्री चौहान यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर
कृषी विज्ञान केंद्रे, कृषी सखी, ड्रोन दीदी, विमा सखी, बँक सखी, तसेच सरपंचांद्वारे ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्यात येणार आहे. यासोबतच खरीप हंगामाशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधण्याची संधी देखील यामधून मिळणार आहे.
योजनेचा आतापर्यंतचा ठसा
२०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेद्वारे आजवर १९ हप्त्यांमध्ये ३.६९ लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आगामी २०व्या हप्त्यात सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांना २०,५०० कोटी रुपये वितरित होणार आहेत.
या बैठकीस कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, ICAR चे महासंचालक डॉ. एम. एल. जाट, आणि कृषी मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारचा उद्देश आहे की जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यात यावा आणि ग्रामीण भागात शाश्वत कृषी विकासास चालना मिळावी.















Leave a Reply