Navi Mumbai अव्वल! राष्ट्रपतींकडून NMMC ला प्रथम क्रमांकाचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ | Kailas Shinde

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाची विजेती ठरली आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला.

या प्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय जलशक्ती व रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. राजभूषण चौधरी, जलसंसाधन व गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव व्ही. एल. कंथाराव तसेच नवी मुंबई महापालिकेचे अति. शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते.

🔹 नवी मुंबईच्या जलव्यवस्थापनातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय दखल

नवी मुंबई महापालिकेच्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींची राष्ट्रीय पातळीवर विशेष नोंद घेण्यात आली. पुरस्कारासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे—

  • मोरबे धरणामुळे शहर पूर्णपणे जलसमृद्ध आणि पाणी पुनर्वापरामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत
  • सर्व पाण्याचे १००% मीटरिंग, सक्षम जलवितरण प्रणाली
  • पारदर्शक डिजिटल बिलिंग, ९६% वसूली
  • १००% सांडपाणी प्रक्रियाकरण, अत्याधुनिक SBR तंत्रज्ञान
  • ७ मलप्रक्रिया केंद्रे (क्षमता ४५४ द.ल.लि.)
  • ४ टर्शिअरी ट्रीटमेंट प्रकल्प (क्षमता ५२.५ द.ल.लि.), अल्ट्राफिल्टरेशन व UV प्रक्रिया
  • ६४ उद्योगांना पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा पुरवठा
  • उद्याने, कारंजे, रस्ते धुलाई, RMC प्लांट, बांधकाम साईट यांसाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर
  • नवीन इमारतींसाठी दोन स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनची अनोखी संकल्पना — देशातील पहिलीच महापालिका
  • पाण्याची गळती अत्यंत कमी; NRW मानकापेक्षा खाली

देशभरातून आलेल्या ७५१ प्रस्तावांमधून नवी मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. जल आयोग व भूजल मंडळाच्या प्रत्यक्ष पाहणीसह पारदर्शक स्कोअरकार्ड प्रणालीवर आधारित मूल्यांकनानंतर ही निवड करण्यात आली.

“हा पुरस्कार नवी मुंबईकरांचा सन्मान” — आयुक्त डॉ. शिंदे

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कैलास शिंदे म्हणाले की—

“हा सन्मान नवी मुंबई महापालिकेच्या सुयोग्य, शाश्वत आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापनाचा राष्ट्रीय गौरव आहे. या यशामध्ये नवी मुंबईकर नागरिकांचा सक्रिय सहभाग, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.”

तसेच त्यांनी पुढे सांगितले की—

“नवी मुंबईची जलप्रणाली देशासाठी आदर्श ठरत आहे. पुढील काळातही शहर विकासाला सुसंगत अशी दीर्घकालीन पाणी व्यवस्थापन धोरणे अंमलात आणली जातील. पर्यावरण संरक्षण, पाण्याची बचत आणि भावी पिढ्यांचा विचार करून महापालिका सातत्याने कार्यरत राहील.”

नवी मुंबई महानगरपालिकेच्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शहराचे नाव पुन्हा एकदा देशाच्या पातळीवर उज्ज्वल झाल्याबद्दल नवी मुंबईकरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *