केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे ‘सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार – 2024’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम पुरस्कार पटकाविला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एका राष्ट्रीय पुरस्काराचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. महानगरपालिकेच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून 18 नोव्हेंबरला नवी दिल्लीत महामाहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश देशभरात जलसंरक्षण, जलसाक्षरता आणि जल व्यवस्थापनाला चालना देणे हा असून, ‘जल समृद्ध भारत’ ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.
या पुरस्कारांसाठी देशभरातून ७५१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानंतर केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला. स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्ड पद्धतीने विजेत्यांची निवड केली.
नवी मुंबई महानगरपालिकेने जलसंपत्तीच्या संवर्धन, पुनर्वापर, वर्षावजल संकलन आणि नागरिकांमध्ये जलजागर या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याने हा सन्मान प्राप्त झाला आहे.
या राष्ट्रीय गौरवामुळे नवी मुंबई शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून “नवी मुंबई महानगरपालिका अभिमान आमचा!” अशा शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














Leave a Reply