‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यासोबतच पर्यावरणाचीही काळजी घेण्यात येत असून त्या अनुषंगाने दिघा येथील शाळा क्रमांक 108 व 79 येथील विद्यार्थ्यांमार्फत 140 देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालकही सहभागी झाले होते. यावेळी निंब, अर्जुन, आवळा, करंज, जांभूळ अशा देशी वृक्ष रोपांची लागवड दिघा विभागातील इलठणपाडा, विष्णूनगर, पंढरीनगर भागातील टेकडीवर करण्यात आली. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन संस्थेच्या सदस्यांमार्फत 75 देशी वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे दिघा पटनी रोड येथील ग्रीन वर्ल्ड इमारती समोरील मोकळ्या जागेत दिघा विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्या वतीने ताम्हण, जांभूळ, कडुनिंब या 25 देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. दिघा विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. नैनेश बदले व स्वच्छता अधिकारी श्री. प्रविण थोरात यांच्या माध्यमातून उद्यान विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.
अशाचप्रकारे कोपरखैरणे विभागात शाळा क्रमांक 38 येथेही विद्यार्थ्यांच्या हस्ते मुख्याध्यापिका श्रीम. रत्नमाला पाटील यांच्या पुढाकारातून सहा.आयुक्त श्री. भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री. राजु सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कचरा वर्गीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तसेच योग्य प्रकारे कचरा ठेवणे व कुठेही कचरा न टाकणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतही विद्यार्थी प्रबोधन करण्यात आले. तुर्भे विभागातच गामी इंडस्ट्रीज् जवळील झोपडपट्टी भागातही कचरा वेगवेगळा ठेवणे व प्लास्टिक बंदी याविषयी जनजागृती करण्यात आली.
अभियानांतर्गत बेलापूर विभागात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधक तपासणी मोहीमेमध्ये 3 व्यावसायिकांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा तसेच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आढळल्याने प्रत्येकी 5 हजार अशा रितीने एकूण 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये दररोज स्वच्छता व आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या निरीक्षणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.














Leave a Reply