नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड,अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी महापौर सुधाकर सोनवणे व .जयवंत सुतार माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी विरोधी पक्ष नेते नामदेव भगत, .सिद्राम ओव्हाळ, महेश खरे, रविंद्र सावंत, शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. यावेळी महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला.
नेरुळ से.26 येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुत-यावर भगवान गौतम बुद्ध यांचा 2.80 मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे.
याप्रसंगी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता .मदन वाघचौडे, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला.














Leave a Reply