नेरुळ (पश्चिम) येथील प्रभाग ३६ मधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक विजय माने आणि माजी नगरसेवक काशिनाथ पवार यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम त्यांच्या सोसायटीमध्ये/घरी जाऊन राबविण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट डिझाइनचे फोल्डर, आकर्षक पेन सेट आणि विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक विजय माने, माजी नगरसेवक काशिनाथ पवार यांच्यासोबतच शिवसेना युवती शहर अधिकारी अश्विनी विजय माने, प्रभाग ३६ मधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या या यशाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख विजय माने म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या अथक जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करणे आणि त्यांना भविष्यासाठी प्रोत्साहन देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. भविष्यातही त्यांनी असेच उत्तुंग यश मिळवावे, यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
या अभिनंदनीय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना पुढील अभ्यासासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम शिवसेनेच्या समाजाभिमुख आणि सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य निश्चितच वाढण्यास मदत होणार आहे.














Leave a Reply