नवी मुंबई | ७ जुलै २०२५
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी — भक्ती, निष्ठा आणि समर्पणाचा उत्सव! या पवित्र दिवशी सीबीडी बेलापूरमधील अग्रोळी गावात एक भक्तिभावाने भरलेला, प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला.
हा भक्तीमय कार्यक्रम नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हा संघटक व माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील आणि नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांच्या पुढाकाराने आणि सेवाभावी सहकार्यातून आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, पंढरपूरला जाऊ शकत नसलेल्या भाविकांना आपल्या परिसरातच विठ्ठल दर्शन व भक्तीचा अनुभव घेता यावा, हा उदात्त हेतू होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरोज पाटील व रोहिदास पाटील यांच्या हस्ते विठ्ठल माऊलीच्या भक्तिपूर्वक पूजनाने झाली. त्यानंतर सुश्राव्य भजनसंध्या, पारंपरिक वारकरी गीते आणि ‘विठ्ठल नामाचा गजर’ वातावरणात भर टाकत होता. यासोबतच उपस्थित भाविकांसाठी फराळ व खिचडी वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगला होता.
या सोहळ्याला अनेक भाविकांनी अगदी मनोभावे हजेरी लावली. पांडुरंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीचा तेज दिसून येत होता. उपस्थितांनी यावेळी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला पंढरपूर वारीचा भक्तिमय अनुभव आपल्या परिसरातच घेता येतो.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे पाटील दाम्पत्य दरवर्षी स्वतः वारीमध्ये सहभागी होऊन सेवा करत असतात. वारकरी संप्रदायाच्या मूल्यांची जपणूक करत ते समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधत असतात. आजचा आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम त्यांच्या सातत्यपूर्ण सेवाभावाचे आणि भक्तीभावाचे प्रतीक ठरला.
या सोहळ्याला बाबू गवस महाराज, उपजिल्हा संघटक मधुरा पाटील, मधुमती हरपळकर, संगीता पाटील, गीता पाटील, मनीषा पाटील, वर्षा अंगोडे, कविता बर्वे, दिव्या घरत, विभाग संघटक सूजता म्हात्रे, श्वेता पवार, तसेच विनोदिनी पाटील, दर्शनी जाधव, धनश्री विचारे, महेश पाटील, संजय म्हात्रे आणि इतर अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रसंगी बोलताना सरोज पाटील आणि रोहिदास पाटील यांनी भाविकांचे आभार मानत असे सांगितले की, “ही केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. पुढेही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्ती आणि समाजसेवेची जोपासना केली जाईल.”
उपस्थित भाविक आणि महिला कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम एक “भक्तांसाठी पर्वणी” असल्याचे नमूद करत पाटील दाम्पत्याच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.














Leave a Reply