नेरुळ, नवी मुंबई | 6 जुलै २०२५
आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी नवी मुंबईतील नेरुळ – कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एक उत्साहवर्धक आणि भव्य आषाढी एकादशी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम, गजर, कीर्तन, भजन आणि सामूहिक दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीने न्हालेला दिसून आला.
या पावन सोहळ्याला राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक, माजी खासदार मा. संजीव नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका सुजाता पाटील, समाजसेवक गणेश भगत तसेच मौजे नवीन कुकशेत देवस्थान समितीचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याचे स्वरूप अधिकच भव्य झाले.
मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या गजरांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी टाळ, मृदुंगाच्या तालावर ‘विठू माऊली’चा जयघोष करत सामूहिक कीर्तनात सहभाग घेतला. भक्ती, श्रध्दा आणि आनंदाने भारलेल्या वातावरणात पांडुरंग रुख्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दीर्घ रांगा लावल्या.
या उत्सवामुळे स्थानिकांना पंढरपूरच्या वारीचा भक्तिमय अनुभव मिळाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करत संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
या भक्तिमय सोहळ्याने नेरुळ – कुकशेत परिसरात आध्यात्मिकतेचा नवा उत्सव उभारला असून, अशा पवित्र सणांच्या माध्यमातून समाजात भक्ती, एकता आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.














Leave a Reply