नवी मुंबई : जीवनात आरोग्याचे महत्व सर्वाधिक असून त्यादृष्टीने अनारोग्य टाळण्यासाठी स्वच्छतेचे महत्व अनन्यसाधारण आहे. यादृष्टीने ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाचा नवी मुंबईतील शुभारंभ देशाचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आला असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंध, वृक्षारोपण संवर्धन या बाबी लक्षात घेऊन अभियानांतर्गत संपूर्ण जुलै महिन्यात विविध स्वच्छता व आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाचा आज 1 जुलै रोजी शुभारंभ होत असतांना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सारसोळे येथील नमुंमपा शाळा क्रमांक 92 व 121 येथे विशेष कार्यक्रमांत उपस्थित विद्यार्थी, पालक व नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, सहा. आयुक्त श्री.जयंत जावडेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेऊन संपूर्ण महिनाभर अभियान अंतर्गत नियोजन केलेल्या उपक्रमांमध्ये व्यापक नागरिक सहभागावर भर देण्यात येत असून त्यामध्ये प्राधान्याने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्व व त्या माध्यमातून आरोग्याचे महत्व पटवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत व मित्र परिवारापर्यंत ते सर्वत्र प्रसारित होईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत तसेच प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच सध्या जाणवणारी ग्लोबल वॉर्मींगची समस्या कमी करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या परिमंडळ 2 उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी प्रास्ताविकवर मनोगतात ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानात 1 ते 31 जुलै या महिन्याभराच्या कालावधीत दररोज महापालिका आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे कॅलेंडर तयार करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये हातांची स्वच्छता, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, स्वच्छ शौचालये, जलस्त्रोत व ड्रेनेज स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता अशा अभियान अंतर्गत सूचविलेल्या 6 बाबींच्या अनुषंगाने ठोस कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी आयुक्त महोदयांच्या हस्ते नमुंमपा शाळा क्रमांक 92 व 121 सारसोळे तसेच विद्याभवन हायस्कृल, नेरुळ या शाळांमधील मोठया संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांना ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याविषयी महत्वाची माहिती असलेली माहितीपत्रके प्रदान करण्यात आली.
आरंभ क्रिएशन्स यांनी सादर केलेल्या स्वच्छता व आरोग्याचा संदेश देणा-या पथनाट्याला उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त दाद दिली. याठिकाणी पावसाळी कालावधी लक्षात घेता किटकजन्य आजारापासून होणारे आजार रोखण्यासाठी घरात व परिसरात डास उत्पती होऊ नये म्हणून याकरिता घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यालाही उपस्थित मान्यवर व पालक,विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत शाळांप्रमाणेच रुणालये, उद्याने याठिकाणीही आज विविध उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले. यापुढे जुलै महिन्याच्या अभियान कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळया ठिकाणी उप्रकम राबविण्यात येत असून त्यामध्ये सर्व नागरिक,विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था व इतर संस्था प्रतिनिधींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.














Leave a Reply