भूखंड क्र. 59, सेक्टर-26, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथील इमारतीचा काही भाग दि. 27 जून 2025 रोजी कोसळल्याची माहिती मिळाल्यानुसार बेलापूर विभाग कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता इमारतीचा काही भाग कोसळल्याचे निर्दशनास आले.
त्यानुसार दि. 28 जून 2025 रोजी सदर भूखंडावरील धोकादायक स्थितीत असलेली इमारत ए विभाग कार्यालय बेलापूर, यांचेमार्फत पूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे तसेच उपअभियंता श्री. पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता श्री. अभय गावीत व श्री.धिरेन भोईर, श्री.नयन भोईर यांचे उपस्थितीत ही धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभाग कार्यालय येथील अधिकारी – कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील सुरक्षारक्षक कार्यरत होते. 2 जेसीबींसह 1 फोकलँड ही यंत्रसामुग्री आणि 10 मजूर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
भु.क्र.59, सेक्टर-26, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील ही इमारत सन 2020-2021 या वर्षी सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडत असल्याचे घोषित केले आहे. दि. 16.08.2024 व दि. 22.05.2025 रोजीच्या पत्रान्वये सदर इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करुन घेण्याबाबत पत्राव्दारे संबंधितांस कळविण्यात आले होते. तथापि 27 जून रोजी या इमारतीचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य हानी टाळण्यासाठी रहिवास नसलेली ही इमारत निष्कासित करण्यात आली.














Leave a Reply