सानपाडा विभागातील समस्या सोडविण्यासाठी भाजपाची नवी मुंबई महापालिकेवर धडक

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील नागरी समस्या निवारणासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाड्यातील रहीवाशांसमवेत महापालिका मुख्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्यांचे गांभीर्य आणून दिले. लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांकडून पांडूरंग आमले व त्यांच्यासमवेत गेलेल्या शिष्टमंडळातील रहिवाशांना देण्यात आले.

सानपाडा सेक्टर १० मधील झाशीची राणी मैदान व सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानाच्या गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, सानपाडा सेक्टर ७ मधील सप्तरंग सोसायटी व बाबू गेनू मैदानासमोरील रस्त्यावरील चेम्बर्सची दुरुस्ती करण्यात यावी, पावसाळा सुरु झाला तरीही सानपाडा नोडमधील धोकादायक झाडांची व ठिसूळ झालेल्या फांद्याची छाटणी झालेली नसल्याने जिवितहानी व मालमत्तेची संभाव्य हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने वृक्षछाटणी अभियान राबवावे, सानपाडा सेक्टर ८ मधील पदपथावर अतिक्रमण करुन पदपथ गिळकृंत करणाऱ्या फेरीवाल्यांना तातडीने हटवून स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हे पदपथ उपलब्ध करुन देण्यात यावेत, सेव्हन्थ डे या शाळेसमोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होत असलेली गर्दी व वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यात यावा, सानपाडा नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांबूस, पिवळसर व लालसर रंगाचे दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला असल्याने या समस्येचे निवारण करुन रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा मागण्या पांडूरंग आमले व शिष्टमंडळातील स्थानिक रहिवाशांनी त्या त्या विभागाच्या उपायुक्तांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन सादर करत समस्या निवारणाबाबत चर्चा केली.

पालिका उपायुक्तांनी आमले व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *