67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला  मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक जाहीर शिबीरांचा लाभ

“शोभेच्या भांडयातील पाणी बदला वेळोवेळी,
घरात नाही होणार डासांची अळी”

पावसाळा कालावधी हा हिवताप / डेंग्यू सारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक असून या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली स्वच्छ साचलेल्या पाण्यामध्ये होत असते. याबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांना ही स्थाने नष्ट करण्याबाबत जागरूक करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातीत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

            महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यापासून ही शिबीरे 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात सातत्याने राबविण्यात येत असून 182 शिबीरांचा लाभ 67,429 नागरिकांनी घेतलेला आहे. या शिबीरांमध्ये 4607 रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

            आज 19 जून रोजीही 26 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात शिबीरे आयोजित करण्यात आलेली असून त्याठिकाणी 11074 नागरिकांनी भेट दिली आहे. तसेच 662 नागरिकांचे रक्तनमुन घेण्यात आलेले आहेत.    

            त्याचप्रमाणे डास प्रतिबंधासाठी महानगरपालिका व खाजगी शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालये याठिकाणी प्रतिबंधात्मक पावडर फवारणी करण्यात येत असून आत्तापर्यंत 214 शाळांमधील 8579 वर्ग खोल्यांमध्ये फवारणी झालेली आहे. तसेच 89 शासकीय / निमशासकीय कार्यालयांमधील 2930 खोल्यांमध्ये पावडर फवारणी करण्यात आलेली आहे.   

            1 जानेवारी 2025 ते 19 जून 2025 पर्यंत 71810 रक्तनमुने घेण्यात आले असून त्यामध्ये 11 हिवताप दूषित रुग्ण सापडलेले आहेत तसेच 132 संशयीत डेंग्यू रुग्णांपैकी 40 जणांचे रक्तजल  एन आय व्ही पुणे/सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकही दूषित डेंग्यू रुग्ण नाही.  

            घरातील व घराबाहेरील झाडांच्या कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी आणि घरातील फेंगशुई अथवा शोभेच्या झाडांमध्ये साचलेले पाणी, गॅलेरीत / गच्चीवरील व घराच्या परिसरात साचलेले भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे तसेच उघड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री मधील पाणी, बांधकामाच्या ठिकाणी जमा पाणी, झाकण नसलेले ड्रम व पाण्याच्या टाक्या याठिकाणी डास उत्त्पती होत असल्याने या जागी पाणी साचून राहणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यायची आहे.

            नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही सातत्याने करण्यात येत असून त्याला डास उत्त्पती होउु न देण्याबाबत नागरिकांचे जागरुक सहकार्य लाभले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांनी याकामी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *