नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 7 मलप्रक्रिया केंद्रे असून त्यामधील कोपरखैरणे व ऐरोली मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे तसेच नेरूळ येथे 5.0 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प कार्यान्वित असून त्यामधील 17 द.ल.लि. पाणी 64 उद्योगसमुहांना पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी दिले जाते.
त्यामध्ये अधिक भर घालत केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत नमुंमपा क्षेत्रात सेक्टर 12, सीबीडी बेलापूर येथील मलप्रक्रिया केंद्रात 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा नवीन प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्याची चाचणी घेतली जात आहे. सदर प्रकल्पाची आज प्रत्यक्ष पाहणी करत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कामांना गती देऊन हा प्रकल्प जलद कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरी भागातील सांडपाण्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया हे उद्दिष्ट साध्य होणार असून येथे तयार होणारे पुनर्प्रक्रियाकृत पाणी बेलापूर विभागातील विविध उद्याने तसेच रस्ते, दुभाजक, वाहने यांची स्वच्छता व इतर वापरासाठी होणार आहे. यामुळे पिण्याच्या शुध्द पाण्याची बचतही होणार आहे. सदर पाणी आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे यादृष्टीने पाईपलाईन व इतर अनुषांगिक बाबीचे नियोजन करावे व पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापराचा कृती आराखडा तयार करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
यावेळी शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे व वसंत पडघन, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे उपस्थित होते
या प्रसंगी आयुक्तांनी टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या कार्यप्रणालीचे अवलोकन केले. त्याच्या प्रक्रियेविषयी बारकाईने माहिती घेतली व येथील पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि पिण्याच्या शुध्द पाण्याची बचत करावी अशा सूचना केल्या.














Leave a Reply