26 मे 2025 रोजी मोठया प्रमाणावरील उधाण भरतीच्या कालावधीत कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे सीबीडी बेलापूरच्या सेक्टर 4, 5, 6, 11 येथील सखल भागात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना झालेला त्रास लक्षात घेता तेथील धारण तलावाच्या ठिकाणी त्या रात्रीच प्रत्यक्ष भेट देत पाहणी करुन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तत्परतेने कार्यवाही करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने अशी परिस्थिती उद्भवू नये यादृष्टीने दिलेल्या सूचनांनुसार अभियांत्रिकी विभागाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची बारकाईने पाहणी आयुक्तांनी आज सदर धारण तलाव ठिकाणी भेट देत केली. तेथील पंपींग हाऊसच्या ठिकाणी त्याच दिवशी अतिरिक्त पाणी उपसा पंप लावण्यात आले होते तसेच जनरेटरचीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नवीन पंप हाऊसच्या सुरू असलेल्या कामास वेग देण्यात आलेला आहे. या सर्व बाबींची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. मदन वाघचौडे व वसंत पडघन, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे उपस्थित होते.
बेलापूर भागातून या धारण तलावात चार ठिकाणाहून पाण्याचे प्रवाह येतात त्यामुळे येथील धारण तलावाच्या आसपासच्या परिसराची लेव्हलींग करुन धारण तलावाची क्षमता वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे फ्लॅप गेट लावलेल्या भिंतीवरून बाहेरच्या भागाची पाहणी करत त्यांनी पाईपच्या आऊटलेट जवळील गाळ नेहमी काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येणार नाही हे लक्षात घेऊन याबाबतची कार्यवाही नियमित करावी असे आयुक्तांमार्फत निर्देर्शित करण्यात आले.














Leave a Reply