नमुंमपा ईटीसी केंद्रामध्ये शाळा प्रवेशोत्सव संपन्न

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी आणि आस्था निर्माण व्हावी याकरिता शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी 16 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रवेशोत्सव साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामध्येही प्रवेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रातील मुलांसाठी हा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला.

उन्हाळी सुट्टी संपून नव्या शैक्षणिक इयत्तेच्या अभ्यासाकरिता येणाऱ्या सर्व विशेष मुलांचे ईटीसी केंद्र संचालक डॉ. अनुराधा बाबर यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले. यावेळी आलेल्या सर्व मुलांना मधूर संगीतासह गुलाबपुष्प आणि पेन्सिल, रबर असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. संचालक डॉ.अनुराधा बाबर यांनी छोट्या मुलांना प्रत्यक्ष भेटून सगळ्यांची आपुलकीने चौकशी केली. या प्रवेशोत्सवात सर्व निम वैद्यकीय कर्मचारी आणि विशेष शिक्षक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

महापालिका आयुक्त श्री. कैलास शिंदे तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांनीही दिव्यांग विद्यार्थ्याना शाळेच्या प्रथम दिवसासाठी व नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. ईटीसी केंद्रातील कर्णबधिर व मतिमंद विभागाचे शैक्षणिक व्यवस्थापक आणि कार्यालय अधीक्षक यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *