घणसोली सेंट्रल पार्क मधील नमुंमपा जलतरण तलावास भरघोस प्रतिसाद

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेंट्रल पार्क, सेक्टर-3, घणसोली येथे मिनी ऑलिम्पिक आकाराचा सर्व सुविधायुक्त जलतरण तलाव 15 मे 2025 पासून नागरिकांच्या वापरास खुला करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सदर जलतरण तलाव अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध करुन देण्यावर भर दिला असल्याने नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

या जलतरण तलावामध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थींना 15 दिवसाच्या कालावधीत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली असून आजमितीस प्रशिक्षणार्थींच्या दोन बॅचेस यशस्वीपणे पूर्ण झालेल्या आहेत. पोहणे शिकाऊ नागरिकांच्या पहिल्या बॅचमध्ये 230 प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी 209 प्रशिक्षणार्थी अतिशय उत्तम प्रकारे पोहण्यास शिकलेले आहेत. उर्वरित प्रशिक्षणार्थींपैकी दहा वर्ष आतील मुलामुलींना अधिक चांगल्या प्रकारे पोहता यावे याकरिता पुन:श्च नुतनीकरण करुन प्रशिक्षण देण्यात येत आहे.

त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये 335 शिकाऊ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी 313 प्रशिक्षणार्थी उत्तमरित्या पोहण्यास शिकलेले आहेत.

महानगरपालिकेच्या घणसोली जलतरण तलावामध्ये दिघ्यापासून नेरुळपर्यंतचे अनेक पालक आपल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी येत असून पहिल्याच महिन्यात 565 शिकाऊ आणि 487 पोहता येत असलेल्या अशा एकूण 1052 नागरिकांनी जलतरण तलावाचा लाभ घेतला आहे. यासाठीच्या प्रवेश व प्रशिक्षण शुल्कापोटी रु.6.22 लक्ष इतकी रक्कम महानगरपालिकेत जमा झालेली आहे.

प्रत्येक बॅचमध्ये क्षमतेनुसार प्रवेशाची संख्या मर्यादित असल्याने अनेक इच्छुक नागरिक व पालक प्रतिक्षा यादीवरही आहेत. त्याचबरोबर पोहता येते अशा नागरिकांनाही मासिक शुल्क आकारणी करुन प्रवेश दिला जात आहे.

घणसोली जलतरण तलावाची वेळ सकाळी 6 ते 10 वा. आणि सायं. 5 ते 9 वा. असून यामध्ये प्रत्येकी एक तासाच्या नऊ बॅचेस मध्ये प्रशिक्षणार्थी व सभासदांना जलतरण तलावावर प्रवेश देण्यात येत आहे. महिलांसाठी संध्याकाळी 4 ते 5 वा. वेळेत विशेष बॅच आहे.

या तरण तलावाठिकाणी उत्तम व अनुभवी प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आल्यामुळे त्यांच्यामार्फत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींना उत्तम प्रकारे पोहण्यासाठी शिकविले जात आहे. त्यामुळे इतर जलतरण तलावातील इच्छुक नागरिकही याठिकाणी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडून सेंट्रल पार्क, घणसोली येथील जलतरण तलावात शिस्तबद्ध व उत्तम नियोजन करून नागरिकांना सेवा देण्यात येत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *