16 जून रोजी शाळा सुरु होत असल्याने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये ‘चला – शाळेत जाऊया!’ म्हणत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्व ठिकाणी उत्साही वातावरणात मान्यवरांसह शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सवाचा आनंद व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नेरुळगाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 10 येथे शाळा प्रवेशोत्सव समारंभास उपस्थित राहून गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी लेझीमच्या तालावर ढोलताशांच्या गजरात प्रवेशव्दारापासून शाळेच्या इमारतीपर्यंत नवागत विद्यार्थ्यांना मिरवणूकीव्दारे वाजत गाजत आणून त्याठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी नवागत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कागदावर उमटवून त्यांचे शाळेतील पहिले पाऊल संग्रहीत करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याचसोबत पहिली ते आठवीच्या मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नेरूळ शाळेच्या आवारात आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते तसेच इतर शाळांमध्येही मान्यवरांच्या व विद्यार्थी, पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या 12 मार्च 2025 रोजीच्या पत्रानुसार यावर्षीच्या शालेय वर्ष आरंभाच्या पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये अत्यंत उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याकरीता शिक्षण विभागामार्फत कोणत्या शाळेत महानगरपालिकेचे कोणते अधिकारी उपस्थित राहणार याचे बारकाईने नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी नमुंमपा शाळा क्र. 92 कुकशेत येथे तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे यांनी नमुंमपा शाळा क्र. 1 बेलापूर येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी केलेल्या नियोजनानुसार सर्व विभागप्रमुख, अधिकारी यांनी आपल्याला नेमून दिलेल्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत केले.
यावेळी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पहिली ते आठवी हा मुलांचा पाया असून या वर्षांमध्ये मूलभूत संकल्पनांचा विकास होणे गरजेचे असते असे सांगत या संस्कारक्षम वयात मुलांचा गुणवत्तेसह भावनिक विकास करण्याकडेही शिक्षकांनी बारकाईने लक्ष द्यावे असे म्हटले. मुले ही देशाची संपत्ती असून आजचे चांगले विद्यार्थी हेच उद्याचे सुजाण व सक्षम नागरिक होणार असल्याने त्यांच्यातील उणीवा दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन करावे व त्यांना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा द्यावी व प्रोत्साहित करावे आणि त्यांना घडविण्याची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना महनीय व्यक्तींची चरित्रे वाचण्याची सवय लावून त्यांच्या नजरेसमोर आदर्श निर्माण करावेत असे शिक्षकांना सांगतानाच पालकांनीही मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांचा कल बघून त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले. जसजसे अभ्यासक्रम बदलतात तसे शिक्षकांनीही अद्ययावत होण्यासाठी प्रयत्न करावेत असे शिक्षकांना सूचित करीत शिक्षण विभागामार्फत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाठ्यपुस्तकातील मजकूर सारखा असला तरी तो शिकवतांना शिक्षकांनी कौशल्याचा वापर करुन विद्यार्थ्यांना गोडी लागेल अशा पध्दतीने शिकवावा आणि विविध शैक्षणिक प्रयोग करावेत असे सूचित करण्यात आले. आनंददायी शिक्षण हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सर्वांगीण विद्यार्थी विकासाला प्राधान्य देण्यास आयुक्त महोदयांनी सांगितले.
नमुंमपा शाळा क्र. 9 नेरूळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी एआय तंत्रज्ञानाची तोंडओळख उपायुक्त श्रीम.स्मिता काळे यांनी इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना करून दिली. यामध्ये एआयच्या माध्यमातून नवीन भाषा, तंत्रज्ञान, गणित, कथा याविषयी सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता सर्व शाळांमध्ये नानाविध गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गुलाबाची फुले, चॉकलेट व्यवस्था तसेच रांगोळी सजावट, वर्ग सजावट, शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, सेल्फी पॉईंट, लेझीमच्या तालावर ढोलताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत, पुस्तकाची पालखी अशा विविध प्रकारे हा शालेय आरंभ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.














Leave a Reply